मुंबई : सायबर गुन्हेगारांनी आता सामान्य नागरिकांसोबतच प्रसिद्ध व्यक्तींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि अभिनेता ऐश्वर्य ठाकरे यांच्यासोबत ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार घडला आहे. त्यांच्या बँक खात्यातून कोणतीही परवानगी न घेता 6 वेळा पैसे काढण्यात आले. या व्यवहारांमधून एकूण 19,015 रुपये गायब झाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी रात्री ऐश्वर्य ठाकरे यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला एकच व्यवहार झाल्याचा त्यांना संशय होता. मात्र, त्यांनी खात्याचे स्टेटमेंट तपासले असता आणखी काही व्यवहार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर एकूण 6 वेळा पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व व्यवहारांची रक्कम 19,015 रुपये असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर ऐश्वर्य ठाकरे यांनी तातडीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासात हे व्यवहार परदेशातून झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरण्यात आली, याचा तपास अद्याप सुरू आहे.

पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, बँक खात्याची माहिती सायबर चोरट्यांपर्यंत कशी पोहोचली, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. ऐश्वर्य ठाकरे हे स्मिता ठाकरे आणि दिवंगत जयदेव ठाकरे यांचे पुत्र असून अभिनेता आहे. तसेच अनुराग कश्यप यांच्या ‘निशांची’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.








