सागर जगदाळे

भिगवण, ता.४: पुणे ग्रामीण जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष तपास मोहिमेला मोठे यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत तब्बल १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक जिल्ह्यातील दरोडा, घरफोडी, जबरी चोरी तसेच वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते.

दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलिस उपनिरीक्षक सुधीर बाळुंग व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. पुणे-सोलापूर महामार्गावरील जगदंब हॉटेलजवळ काही संशयित मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला.

काही वेळातच संशयित मोटारसायकलवरून तेथे आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मोबाईल ऊर्फ हरी पवार (वय २२, रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर,) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यांच्याकडील मोटारसायकलीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासात दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील मोबाईल फोनही मिळून आला.
दुसऱ्या कारवाईत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी शक्तिमान हुबऱ्या काळे (वय २२, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी या आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत पुणे ग्रामीण जिल्ह्यातील दौंड येथील एक, जबरी चोरीचा एक, घरफोडीचे आठ, तर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे दोन असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत चोरीस गेलेले सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, बारामती विभाग तसेच पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
जिल्ह्यातील विविध चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मिळालेले हे यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे.






