भोंगवली : भोर तालुक्यातील भोंगवली येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचा लॉकर फोडत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 69 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12.45वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे भोंगवली परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी विवेक विष्णू पाटील (वय 64, व्यवसाय शेती, रा. भोंगवली, ता. भोर, जि. पुणे) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास भोंगवली येथील फिर्यादी यांच्या राहत्या घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले. संबंधित चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचा लॉकर फोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये20 ग्रॅम वजनाचे अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाचे अंदाजे एक लाख रुपये किमतीचे दुसरे सोन्याचे मणी मंगळसूत्र, प्रत्येकी दोन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी असा 40 हजार रुपयांचा ऐवज, 24 हजार रुपये किमतीची चांदीची 12 जुनी नाणी आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

फिर्यादीच्या वर्णनानुसार, चोरी करणारा इसम सावळ्या रंगाचा असून त्याने जांभळ्या रंगाचा चौकड्यांचा फुल बाह्यांचा शर्ट परिधान केला होता. या अज्ञात व्यक्तीने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने हा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद 31 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजून 3 मिनिटांनी राजगड पोलीस ठाण्यात करण्यात आली. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 305 (अ) आणि 331(1) अन्वये अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत असून राजगड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
भरदिवसा घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याने भोंगवली परिसरातील नागरिकांनी आपल्या घरांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान आता राजगड पोलिसांसमोर आहे.






