लोणी काळभोर, ता. ४ : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सुमारे ९ हजार सभासद शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकीत ऊसबिलांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, कारखान्याकडून १४ कोटी ७ लाख १४ हजार ६५९ रुपयांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते ५०० सभासद शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करून या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप उपस्थित होते.

कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००९-१० आणि २०१०-११ या गळीत हंगामातील ऊसबिलांची अंतिम पेमेंटशीट प्रशासकीय काळात तयार झाली नव्हती. त्यामुळे जुन्या नोंदींची पडताळणी करणे हे कारखाना व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान होते. यासाठी संगणक विभाग आणि ऊसबिल विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेऊन उपलब्ध जुन्या रेकॉर्डच्या आधारे अंतिम याद्या तयार करण्यात आल्या.
या थकीत रकमेमध्ये सन २००९-१० च्या गळीत हंगामातील १ हजार ६७४ शेतकऱ्यांचे ४ कोटी २२ लाख २४ हजार ११४ रुपये, सन २०१०-११ मधील २ हजार ६३२ शेतकऱ्यांचे ८ कोटी ९२ लाख ९ हजार २३९ रुपये, तर त्याच हंगामातील अतिरिक्त ४० रुपये प्रतिमेट्रिक टन दरानुसार ३ हजार ९५३ शेतकऱ्यांचे ९२ लाख ८९ हजार ३०६ रुपये वितरित करण्यात येत आहेत. अशा प्रकारे एकूण १४ कोटी ७ लाख १४ हजार ६५९ रुपयांचे धनादेश शेतकऱ्यांना दिले जात आहेत.

विशेष म्हणजे, धनादेश वाटप करताना कायदेशीर बाबींचीही काळजी घेण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या किंवा इतर कपातीच्या रकमा संबंधित बँकांना पाठविण्यात आल्या नव्हत्या, त्या कपाती न करता संबंधित रक्कम शेतकऱ्यांना परत केली जात आहे. तसेच मयत सभासदांच्या वारसांकडून संमतीपत्र घेऊन त्यांच्या निश्चित केलेल्या वारसांच्या नावाने धनादेश दिले जात आहेत.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरी धनादेश पोहोचणार
थकीत ऊसबिलांचे धनादेश मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी दिवाळीपूर्वी संबंधित सर्व सभासद शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धनादेश सुपूर्द करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली. मयत सभासदांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रे कारखान्याच्या शेअर्स विभागात जमा करून वारसनोंद पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही व्यवस्थापनाने केले आहे.
यावेळी बाळासाहेब चौधरी, संचालक संतोष कांचन, किशोर उंद्रे, राहुल घुले यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि सभासद उपस्थित होते. दरम्यान, कारखाना पुन्हा पूर्ववत सुरू करून अत्याधुनिक यंत्रसामग्री, आसवणी प्रकल्प आणि सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्धार संचालक मंडळ व सभासदांनी व्यक्त केला. कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.







