पुणे : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर फटाके स्टॉल्सची संख्या वेगाने वाढली आहे. निवासी भाग, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून हे स्टॉल्स लावण्यात आल्याने मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकारावर पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन अनधिकृत स्टॉल्सवर जप्तीची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक तसेच सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. नियम तोडणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक पावले उचलावीत, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर हे स्टॉल्स मांडल्यामुळे पुण्यातील आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. जर दुर्दैवाने एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर अग्निशामक दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणे कठीण होऊन बसणार आहे.

नियमांनुसार फटाक्यांचे स्टॉल्स हे मोकळ्या मैदानावर किंवा वस्तीपासून सुरक्षित अंतरावर असणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक ठिकाणी थेट सोसायट्यांच्या जवळच हे दुकान मांडण्यात आले आहेत. बहुतांश अनधिकृत स्टॉल्सवर अग्निशामक यंत्रे, पाण्याचे ड्रम किंवा वाळूच्या बादल्यांसारख्या प्राथमिक सुरक्षा सुविधाही उपलब्ध नाहीत.प्रशासनाने वेळीच पावले उचलून या बेकायदेशीर फटाके स्टॉल्सवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.








