बीड : जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील सिद्धार्थनगरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पतीच्या सततच्या त्रासाला आणि अनैतिक संबंधांना वैतागून 25 वर्षीय विवाहितेने बाथरूम साफ करण्याचे ॲसिड पिऊन आपले जीवन संपवले. देवकन्या सुनील बदने असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी पतीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या श्रीमंत पंढरी गित्ते यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, देवकन्याचा विवाह 2019 मध्ये सुनील सुरेश बदने याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यानंतर काही काळ सर्व काही ठीक होते. मात्र, काही दिवसांनी पतीने दारू पिऊन तिला मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, पतीचे इतर महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय देवकन्याला आला होता.
नातेवाईकांनी पतीची बऱ्याचदा समजूत काढली. परंतु, सुनीलच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट त्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास अधिकाधिक वाढतच गेला. या रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर देवकन्याने राहत्या घरीच ॲसिड प्राशन केले.
तिची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे तिला तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

वडिलांच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार आरोपी पती सुनील बदनेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनमोल केदार करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







