मुंबई : धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत एका ४२ वर्षीय महिलेचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याची गंभीर घटना मीरा रोड परिसरातून समोर आली आहे. वृंदावन येथील संत इंद्रदेव महाराज यांच्याविरोधात पीडित महिलेने आरोप केले आहेत. या प्रकरणी मीरा-भाईंदरमधील काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२३ मध्ये सोशल मीडियावर महाराजांचे प्रवचन पाहिल्यानंतर ती त्यांच्या संपर्कात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये मुंबईतील सांताक्रूझ येथे आयोजित सत्संगात तिने महाराजांकडून दीक्षा घेतली. वैयक्तिक अडचणी दूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने तिचा महाराजांवरील विश्वास अधिक दृढ झाला.
त्यानंतर वृंदावन येथील सेवाधाम आश्रमात मुक्कामादरम्यान महाराजांनी रात्री साडेदहाच्या सुमारास औषध घेण्याच्या बहाण्याने महिलेला आपल्या खोलीत बोलावले. दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, २९ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडल्याचा दावाही तिने तक्रारीत केला आहे.

दरम्यान, महाराजांनी महिलेच्या घरातील मालमत्तेची चौकशी केली. तिच्या लहान मुलीला दत्तक घेण्याचे आश्वासन देत कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. या प्रकरणाशी संबंधित रेकॉर्डिंग दुसऱ्या एका महिलेकडे पोहोचल्यानंतर महाराजांनी १७ जून २०२६ रोजी फोन करून गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. तसेच, बदनामी झाल्यास आत्महत्या करण्याची भीती व्यक्त केल्याचेही महिलेने म्हटले आहे.

सुरुवातीला सामाजिक प्रतिष्ठा आणि बदनामीच्या भीतीने महिला शांत राहिली. मात्र, अखेर धैर्याने पुढे येत तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. धार्मिक श्रद्धेच्या आडून महिलांचे शोषण होत असल्याच्या या आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात नेमके काय सत्य आहे, तसेच तक्रारीतील आरोपांची पडताळणी तपासादरम्यान कशी होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.







