पुणे: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील विविध विकासकामांना वेग आला आहे. यामध्ये द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या द्वारका इंटरचेंजच्या कामाचाही समावेश आहे. पुणे रोड ते नाशिकदरम्यानचा सुमारे १०० मीटर लांबीचा भुयारी मार्ग जानेवारीअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पुणे ते नाशिक प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मुंबई आणि धुळे बाजूकडील वाहनचालकांना कुंभमेळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

पुणे रोड ते नाशिकदरम्यानच्या द्वारका इंटरचेंजच्या कामाला वेग आला आहे. उड्डाणपुलाखाली मर्यादित जागा उपलब्ध असतानाही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने अभियांत्रिकीची आव्हाने पेलत ५६३ मीटर लांबीच्या इंटरचेंजचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण केले आहे.
पुणे बाजूकडील रॅम्प आणि भुयारी मार्गाचे दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ५३ मीटर लांबीचे बांधकामही पूर्ण करण्यात आले आहे. सध्या काँक्रीटला आवश्यक मजबुती मिळण्यासाठी क्युरिंग प्रक्रिया सुरू आहे.

काँक्रीट क्युरिंग आणि नाशिक बाजूकडील उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे मुख्य मार्ग जानेवारीअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे रोडकडून येणाऱ्या वाहनधारकांना द्वारका सर्कल परिसरातील वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, द्वारका इंटरचेंजवरील यू-टर्नची कामे अद्याप अपूर्ण आहेत. मुंबई आणि धुळे बाजूकडील दोन्ही यू-टर्नची कामे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही कामे कुंभमेळ्यानंतरच पूर्ण होतील.
यामुळे पुणे बाजूकडील वाहनधारकांना जानेवारीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी मुंबई आणि धुळे बाजूकडून येणाऱ्या वाहनचालकांना कुंभमेळ्यापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.






