ठाणे : मानपाडा परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पूर्णेकर कुटुंबीयांकडून माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती प्रदीप शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत असून, त्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीच राम पूर्णेकर आणि त्यांच्या निकटवर्तीयांना पोलीस संरक्षण वाढवून देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

माझ्यावरही विविध प्रकारचे आरोप केले जात असून, त्याचा गैरफायदा घेऊन राजकीय विरोधक कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याची भीती मिनाक्षी शिंदे यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
दिवंगत प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या दुःखात आहे. पित्याच्या अकाली निधनाचा मानसिक आघात सहन करणे त्यांच्यासाठी कठीण झाले आहे. अशा भावनिक परिस्थितीत विरोधकांकडून या कुटुंबाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

राजकीय स्वार्थासाठी विरोधकांकडून कुटुंबीयांच्या बाबतीत घातपात किंवा अनुचित प्रकार घडवून आणला जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. काही विरोधी नेत्यांचे मुख्य आरोपींशी संबंध असल्याचे संकेत आणि माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यासोबत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेले काही आरोपी उपस्थित असल्याचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे.

या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीय आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये, ही प्राथमिकता असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे. कुटुंबीय आधीच मानसिक तणावाखाली असून, संभाव्य धोक्यांमुळे त्यांची असुरक्षितता वाढू शकते. त्यामुळे राम पूर्णेकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे असलेल्या मदतनीसांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राम पूर्णेकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह दिनेश पवार, अखिलेश पाल, प्रशांत मोटे, आनंद भोईर, किसान तट्टे आणि विवेक पांढरे यांना सध्याच्या पोलीस संरक्षणात तातडीने वाढ करून आवश्यक ते संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या निधनानंतर ठाण्यातील विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल परब, माजी खासदार राजन विचारे, उबाठा गटाचे केदार दिघे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव आणि मनसेचे अभिजित पानसे हे या प्रकरणाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून कटकारस्थाने रचली जात असल्याचा दावाही त्यांनी केला. जनतेमध्ये खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून समाजमाध्यमांचा गैरवापर केला जात असल्याचे तसेच जनआंदोलनांच्या माध्यमातून बिनबुडाचे आरोप होत असल्याचे मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे.







