पुणे : शहरातील कोरेगाव पार्क परिसरातील ‘प्लंज’ (Plunge) पबवर वेळेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित वेळेनंतरही पब सुरू असल्याचे आढळून आल्याने संबंधित पब पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नियमानुसार रात्री दीड वाजेपर्यंतच पब सुरू ठेवण्याची परवानगी असताना, ‘प्लंज’ पब रात्री दोन वाजल्यानंतरही सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे वेळेच्या नियमांचे पालन होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
विशेष म्हणजे, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस मार्शल तपासणीसाठी पबमध्ये गेले होते. त्यावेळी पब व्यवस्थापनाकडून तो बंद असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस मार्शल तेथून निघून गेल्यानंतर काही वेळातच पब पुन्हा सुरू करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

या प्रकाराची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर निर्धारित वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित पबवर कारवाई करण्यात आली असून, पुढील आदेशापर्यंत पब बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.







