पुणे: पुण्यातील नारायणपेठ परिसरात दोन दिवसांपूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय प्रथमेश दिलीप देशमुख याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात प्रथमेश ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या आहारी गेल्याचे समोर आले आहे. या प्रकारात त्याचे चार लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाले आणि त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता.

प्रथमेश हा धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी गावचा रहिवासी होता. मागील तीन ते चार वर्षांपासून तो पुण्यात राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. सदाशिव पेठेतील नंदनवन सोसायटीत तो भाड्याने राहत होता. अभ्यास करत असतानाच त्याला ऑनलाइन बेटिंगची सवय लागली. त्यातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तो कर्जबाजारी झाला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रथमेशने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने कोणाकडून किती पैसे उसने घेतले आणि त्या पैशांचा वापर कुठे केला, याचा तपशील दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर आत्महत्येच्या तीन दिवस आधी त्याचे दाजी आणि एक मित्र त्याला भेटण्यासाठी पुण्यात आले होते. त्यांनी त्याला धीर देत गावी परतण्याचा सल्लाही दिला होता. मात्र, त्यानंतरही प्रथमेशने आत्महत्या केली.

दरम्यान, प्रथमेशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर खासापुरी गावावर शोककळा पसरली. मुलाला मोठ्या पदावर पाहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या त्याच्या आईचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. “माझ्या मुलाला लाल दिव्याच्या गाडीत पाहायचं होतं, पण तो रुग्णवाहिकेतून परत आला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दीपके यांनीही प्रशासनावर टीका केली. “ही आत्महत्या नसून सध्याच्या उदासीन व्यवस्थेने घेतलेला बळी आहे,” असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.






