पुणे : दारूच्या नशेत पोलीस गणवेश परिधान करून विनानंबर प्लेटची कार विरुद्ध दिशेने चालवणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मांजरी परिसरात हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी महिला कर्मचाऱ्याला जाब विचारल्यानंतर तिने त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी पहाटे घडली. संबंधित ३९ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्या विनानंबर प्लेटची कार भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने चालवत असल्याचे समोर आले. समोरून येणारी कार पाहून इतर वाहनचालकांनी आपली वाहने थांबवली. त्यामुळे संभाव्य अपघात टळला.
महिला कारचालकाला नागरिकांनी थांबवून जाब विचारला. त्यावेळी त्या दारूच्या नशेत असल्याचे आणि पोलीस गणवेशात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या प्रकाराचे नागरिकांनी चित्रीकरण केले आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. संबंधित महिलेने नागरिकांशी वाद घालत शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी रजेवर होत्या. रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस त्या कर्तव्यावर उपस्थित नव्हत्या. रजेच्या कालावधीत पोलीस गणवेश परिधान करण्याची परवानगी नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
त्या बंडगार्डन परिसरात मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करून परतत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या संदर्भातील तपशील अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांकडून नियमांचे पालन आणि सार्वजनिक ठिकाणी जबाबदार वर्तन अपेक्षित असताना घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे.







