पुणे : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमधील शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी सुका चारा आणि मुरघास खरेदीचे कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील दुष्काळ निवारण समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, 30 ऑक्टोबर रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला.

शासनाचे नवीन दर:
सुका चारा: जास्तीत जास्त 12 रुपये प्रति किलो (वाहतूक खर्च सोडून)

मुरघास: जास्तीत जास्त 8 रुपये प्रति किलो (वाहतूक खर्च सोडून)

वर्ष 2026-27 मधील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्यातील 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने 27 ऑक्टोबरच्या बैठकीत या दरांना मंजुरी दिली. हे दर संपूर्ण दुष्काळ कालावधीत लागू राहतील.
दरम्यान प्रशासनाला चारा खरेदी करताना गुणवत्तेची कडक पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार सुक्या चाऱ्यामध्ये ज्वारी आणि बाजरीला मुख्य पसंती दिली जाईल.सुक्या चाऱ्यातील ओलाव्याचे प्रमाण 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.चाऱ्याला कोणताही कुबट किंवा आंबट वास, बुरशी, माती अथवा किडीचा संसर्ग नसावा.
मुरघास खरेदी करताना तो पूर्णपणे हवाबंद पाकिटात असावा.
चाऱ्याचा दर्जा तपासण्यासाठी पुणे (औंध) येथील प्रयोगशाळेसह इतर मान्यताप्राप्त केंद्रांची मदत घेतली जाईल.निश्चित केलेले दर हे केवळ चाऱ्याचे मूळ मूल्य असून, त्यात वाहतुकीचा खर्च समाविष्ट नाही. चाऱ्याच्या वाहतुकीसाठी शासनाकडून स्वतंत्र निधी दिला जाईल. यासाठी परिवहन आयुक्तांनी ठरवून दिलेले वाहतूक दर लागू केले जातील. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील पशुधनाला पुरेसा आणि चांगल्या दर्जाचा चारा मिळण्यास मदत होणार आहे.







