उरुळी कांचन, ता. 31 : मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात दुचाकीस्वाराला दुकानदाराने पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दुकानदाराला मारहाण करून डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतल्याची घटना घडली. दुकानदाराने प्रतिकार करत आरडाओरडा केल्यानंतर चोरट्याने चोरीचा मोबाईल आणि स्वतःची बुलेट दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढला. गुरुवारी (ता. 29) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

बबलू हरीश्चंद्रराय कुमार (वय-40, व्यवसाय झाडांची कुंडी दुकान अंकुश ट्रेडर्स सध्या रा. सोरतापवाडी, बालाजी वजनकाट्या समोर ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू कुमार हे सोरतापवाडी येथे अंकुश ट्रेडर्स या दुकानाच्या मागील बाजूस गेल्या चार वर्षांपासून कुटुंबीयांसह राहतात. झाडे लावण्यासाठीच्या कुंड्या विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. गुरुवारी सकाळी ते दुकानात असताना एका अज्ञात व्यक्तीने काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड हंटर 350 (क्र. एमएच 12 एक्सजे 1167) दुचाकी दुकानासमोर उभी केली. त्यानंतर तो दुकानाजवळ आला.

याचवेळी त्याने बबलू कुमार यांच्यासोबत असलेल्या श्यामबोल कुमार (वय-24) यांच्या खिशातून 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बबलू कुमार यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने हाताने मारहाण केली आणि त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला चावा घेतला. तसेच पुन्हा येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

दरम्यान, बबलू कुमार यांनी प्रतिकार करून आरडाओरडा केल्यानंतर संबंधित व्यक्ती मोबाईल आणि दुचाकी घटनास्थळीच सोडून पळून गेला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार कमलेश होले करीत आहेत.






