राहुलकुमार अवचट

यवत : दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले अवैध व बेकायदेशीर धंदे बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, याबाबतचे निवेदन दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना देण्यात आले आहे.
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड शहर व ग्रामीण भागात दिवसा ढवळ्या भर चौकात मटका, दारू, चक्री, जुगार असे अवैध व बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने शहरातील तरुण चुकीच्या मार्गाला लागून कर्जबाजारी होत आत्महत्या करीत आहेत. यामुळे कित्येक कुटुंबे बरबाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. अवैध धंद्यांवर पोलिसांचा अंकुश राहिला नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खून, घरफोड्या, दरोडे, चेन हिसकावणे यांसारखे प्रकार वारंवार घडत असून, नागरिक व महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध धंद्यांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने चौकशी करून संबंधितांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावेत, मटका, पत्ते, जुगार, चक्री आदी अवैध धंद्यांवर छापे टाकून संबंधित चालकांवर व जागामालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, गांजा, दारू, गुटखा आदी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर, अवैध वेश्याव्यवसाय व मानवी तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी, परवानगी असलेल्या वेळेपेक्षा रात्री 2-3 वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, नागरिकांचे शोषण करणाऱ्या सावकारांवर, महिला व विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या गावगुंड तरुणांवर कारवाई करण्यात यावी, रात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त वाढवावी, तसेच अष्टविनायक मार्गावरील अवजड वाहतूक बंद करून ही वाहतूक शहराबाहेरून वळवण्यात यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

यावेळी माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, ज्येष्ठ नेते महेश भागवत, पोपटराव ताकवणे यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






