उरुळी कांचन : आजी-आजोबांचे प्रेम, त्यांचे अनुभव आणि त्यांनी दिलेले संस्कार हे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील अमूल्य ठेवा असतात. याच नात्याचे महत्त्व अधोरेखित करत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनी आणि त्यांच्या आजी-आजोबांच्या आनंदी सहभागामुळे कार्यक्रमाला भावनिक, सांस्कृतिक आणि मनोरंजक रंगत आली.

आजी-आजोबांच्या सहवासातून जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, कष्ट, माणुसकी आणि नात्यांची जपणूक यांचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. विद्यालयाच्या अध्यक्षा नयॉन सुरेश कांचन, संचालिका डॉ. नुपूर सुरेश कांचन आणि मुख्याध्यापिका पद्मादेवी विडप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींनी आपल्या आजी-आजोबांचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर औक्षण करून त्यांना सन्मानाने स्थान देण्यात आले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागत नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. आजी-आजोबांचे आपल्या जीवनातील स्थान, त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम आणि जिव्हाळा यांचे दर्शन घडविणाऱ्या नाटिकेने उपस्थितांना भावूक केले.

विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतांतून आजी-आजोबांनी दिलेले प्रेम, शिकवलेले संस्कार आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे घडलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सुंदर कवितांच्या सादरीकरणातूनही आजी-आजोबांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करण्यात आला. आजी-आजोबांसाठी आयोजित संगीत खुर्ची आणि विविध मनोरंजक खेळांनी कार्यक्रमात आणखी रंगत आणली. या खेळांमध्ये आजी-आजोबांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि नातवंडांसोबत घालवलेले आनंदाचे क्षण यांमुळे संपूर्ण वातावरण स्नेहपूर्ण झाले.

उन्नती कन्या विद्यालय हे केवळ मुलींसाठी असलेले इंग्रजी माध्यमाचे विद्यालय असून, विद्यार्थिनींमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सामाजिक जाणीव, संस्कार आणि नात्यांबद्दल आदर निर्माण करण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. आजच्या मुली उद्याच्या सजग आणि सुजाण नागरिक बनून संस्कारित समाजाची निर्मिती करतील, हा या उपक्रमांमागील दृष्टिकोन आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी काटदरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी मोलाचे सहकार्य केले. आजी-आजोबा दिनाच्या निमित्ताने प्रेम, आपुलकी, कृतज्ञता आणि संस्कारांचा अनमोल संदेश देत दोन पिढ्यांमधील नाते अधिक दृढ झाले






