पुणे : राज्यभरातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे किंवा ई-केवायसी (e-KYC) पूर्ण न झाल्यामुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या तब्बल 81 लाख लाडक्या बहिणींना आता दरमहा 1500 रुपयांचा सन्माननिधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री आणि वरिष्ठ सचिव उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान किसान सभेच्या प्रतिनिधींनी राज्यातील गरीब आणि आदिवासी भागातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. ई-केवायसी अपूर्ण राहिल्याने लाखो पात्र महिलांना हप्ता मिळाला नसल्याची बाब त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. यावर सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी रखडलेली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

पोर्टल पुन्हा सुरू होणार

ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे किंवा ई-केवायसी पूर्ण होऊनही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, अशा सर्वांसाठी योजनेचे अधिकृत पोर्टल लवकरच पूर्ववत सुरू केले जाईल. प्रशासनाला यासंदर्भात वेगाने अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या या निर्णयामुळे आगामी सणासुदीच्या काळात आदिवासी व वंचित घटकांतील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या खात्यात लवकरात लवकर 1500 रुपये जमा होतील






