मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे बोर्डाने रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत रेल्वे डब्यांमधील मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश पुन्हा जारी केले आहेत. सर्व विभागीय रेल्वे प्रशासनांनी या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

दक्षिण पूर्व रेल्वेच्या हद्दीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर रेल्वे बोर्डाने या नियमाची पुन्हा आठवण करून दिली आहे. मुंबई-हावडा मेलमध्ये एका प्रवाशाची पॉवर बँक चार्जिंगला लावलेली असताना तिचा स्फोट झाला. त्यामुळे डब्यात धूर पसरला होता. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.
या घटनेनंतर संबंधित डब्यात रात्रीच्या निर्धारित वेळेत चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता की नाही, याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी नियमांचे पालन झाले नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आले. त्यामुळे २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सर्व विभागीय रेल्वे प्रशासनांना पत्र पाठवून नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

विशेष म्हणजे, रात्री चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्याचा नियम नवीन नाही. जून २०१४ मध्येच रेल्वे बोर्डाने यासंदर्भात आदेश जारी केले होते. रेल्वे डब्यांमध्ये आग लागण्याचा धोका कमी करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता राखणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश होता. मात्र, काही गाड्यांमध्ये या नियमाचे पालन होत नसल्याचे समोर आल्याने रेल्वे बोर्डाने पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे.

नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना आणि प्रशिक्षण देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी रात्री ११ वाजण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करून घ्यावीत. तसेच चार्जिंगला लावलेली उपकरणे विनाकारण सुरू ठेवू नयेत आणि प्रवासादरम्यान पॉवर बँकचा वापर करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.







