लोणी काळभोर, ता. 31 : लोणी काळभोर परिसरात विनापरवाना देशी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई केली आहे. रायवाडी रोडवरील किराणा दुकानातून देशी दारूची विक्री करणाऱ्या महिलेसह खोकलाई चौकात बारसमोर लपून दारू विकणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी छापे टाकून गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3 हजार 420 रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे.

पहिली कारवाई गुरुवारी (ता. 29) सायंकाळी रायवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या हॉटेल न्यू अमर परमिट रूम अँड बारच्या बाजूला असलेल्या ‘जय मल्हार’ किराणा दुकानात करण्यात आली. या दुकानातून एक महिला विनापरवाना देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तपास पथकाने पंचांसमक्ष सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी अनिता बाळासाहेब देवकर (वय 51, रा. खोकलाई देवी चौक, लोणी काळभोर) ही महिला दुकानातील काउंटरवरून टँगो पंच कंपनीच्या देशी दारूची विक्री करताना आढळून आली. पोलिसांनी तिच्याकडून 90 मिलीच्या 21 आणि 180 मिलीच्या 11 अशा एकूण 32 बाटल्या जप्त केल्या. या दारूसाठ्याची किंमत १ हजार ७२० रुपये आहे.

दुसरी कारवाई शुक्रवारी (ता. 30) दुपारी खोकलाई चौकात परदेशी भेळसमोर असलेल्या के. के. बार अँड परमिट रूमच्या समोर करण्यात आली. या ठिकाणी एका कोपऱ्यात बॉक्समध्ये देशी दारू लपवून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे आणि तपास पथकाने सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी आकाश भारत चेडे (वय 32, मूळ रा. समतानगर, वाशी, जि. धाराशिव, सध्या लोणी काळभोर) हा बॉक्समध्ये ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच दारू खरेदीसाठी आलेले दोन जण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी आकाशला ताब्यात घेत त्याच्याकडील 17 देशी दारूच्या बाटल्या आणि बॉक्स असा एकूण 1 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या दोन्ही प्रकरणांत संबंधितांकडे दारू विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे अनिता देवकर आणि आकाश चेडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) नुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. किराणा दुकान असो वा बारसमोरील आडोसा, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्याने परिसरातील विनापरवाना दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.






