पुणे : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या पूर्वेकडील दुष्काळी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुळशी धरणातील पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करून बोगदा बांधण्याचा पर्याय विचाराधीन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पामुळे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्याचे नियोजन आहे.

मुळशी धरणातील पाण्याचा सध्या प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी वापर केला जातो. वीज तयार झाल्यानंतर हे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. त्यामुळे पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील गावांना त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही. वीजनिर्मितीसाठी होणारा पाण्याचा विसर्ग कमी करून उर्वरित पाणी पूर्वेकडे वळवण्याचा पर्याय मांडण्यात आला आहे. या योजनेला तत्त्वतः सहमती मिळाल्याचे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
बोगद्याच्या कामाला वेळ लागणार

बोगदा बांधण्याच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळवणे आणि प्रत्यक्ष काम पूर्ण करणे यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत नदीपात्रातून थेट पाणी सोडण्याच्या पर्यायावरही प्रयत्न सुरू आहेत. आमदार राहुल कुल यासाठी पाठपुरावा करत आहेत. या योजनेतून पूर्वेकडील भागासाठी सुमारे 5 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. सध्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून शेतीसाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे या प्रकल्पामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.







