पुणे : पुण्यातील सारसबाग परिसरात दादावाडी जैन मंदिराबाहेर उभ्या असलेल्या एका कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (30 ऑक्टोबर) सकाळी सुमारे 9:45 वाजता हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, संबंधित तरुण गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

मृत तरुणाचे नाव शुभरत बाळासाहेब बनसोडे (वय 25, रा. कवडी गाव, लोणी काळभोर) असे आहे. दादावाडी जैन मंदिरासमोरील रस्त्यावर एक कार अनेक दिवसांपासून उभी होती. शुक्रवारी सकाळी या गाडीतून दुर्गंधी येत असल्याचे एका नागरिकाच्या लक्षात आले. त्याने याबाबत पोलिसांना कळवले. माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारची तपासणी केली असता आतील सीटवर तरुणाचा मृतदेह आढळला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला बोलावून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले.
26 ऑक्टोबरपासून तरुण बेपत्ता

पोलिसांच्या माहितीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी शुभरत वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी हडपसर गाडीतळावर गेला होता. त्यानंतर घरी जात असल्याचे सांगून तो निघाला. रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने एका मित्राची भेट घेतली आणि ‘मी चाललो’ असे सांगितले. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला. तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला आणि 28 ऑक्टोबर रोजी हडपसर पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

मित्राच्या कारमध्ये मृतदेह
पोलिसांच्या तपासात मृतदेह आढळलेली कार शुभरतचा मित्र अविनाश परशुराम गायकवाड यांची असल्याचे समोर आले आहे. शुभरत ही कार घेऊन गेला होता. मात्र, तो कार घेऊन सारसबाग परिसरात कसा पोहोचला, गाडी तिथे कधी लावली आणि मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचा तपास सुरू आहे. मृतदेहावर प्रथमदर्शनी जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम पुढील तपास करत आहेत.






