पुणे : पुण्यामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी पतीला कोर्टाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा दिली आहे.

घरातील आर्थिक भार हलका करण्यासाठी पत्नी दिवसभर मेहनत करून इतर लोकांच्या घरी स्वयंपाकाचे काम करायची. मात्र, नराधम पतीच्या मनात तिच्याबद्दल गैरसमज आणि संशय बळावला होता. याच संशयाच्या आगीत जळून त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने घरातील धारदार कोयता उचलून थेट पत्नीच्या डोक्यात वार केला. हा हल्ला इतका भयानक होता की, कोयता तिच्या डोक्यातच रूतून बसला.
या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तिच्या कुटुंबीयांनी तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करून डोक्यात रुतलेला कोयता बाहेर काढला. उपचारांमुळे महिलेचा जीव वाचला, मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एम. भोसले यांच्यासमोर झाली. मानवी शरीरातील डोका हा अतिशय संवेदनशील भाग असून, त्यावर अशा प्रकारे जीवघेणा वार करणे म्हणजे हत्येचा स्पष्ट प्रयत्न होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या गंभीर गुन्ह्याची दखл घेत न्यायालयाने आरोपी पतीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. संशयापायी स्वतःच्या संसाराची राख करणाऱ्या अशा प्रवृत्तींना या निकालामुळे मोठा दणका मिळाला आहे







