पुणे : ठाकरे गटाचे दिवंगत विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाणे पोलिसांवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. गुरुवारी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी काही समर्थकांना ताब्यात घेतले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केल्याचा आरोप राम पूर्णेकर यांनी केला आहे. शुक्रवारी राम पूर्णेकर आपल्या वकिलासह पीडित तरुणांना घेऊन कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या अमानुष वागणुकीचा पाढा वाचला.ते म्हणाले, पोलिसांनी अर्जुन पुंदरेसह काही तरुणांना चौकशीच्या बहाण्याने ताब्यात घेतले होते.मात्र पोलीस ठाण्यात नेऊन या तरुणांचे कपडे काढून त्यांना नग्न करण्यात आले.पोलिसांनी त्यांची अंतर्वस्त्रे काढून एकमेकांच्या डोक्यावर घातल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांनी तरुणांच्या शरीराच्या नाजूक भागावर सूर्यफुल तेल लावून पट्ट्यांनी बेदम मारहाण केली.एका तरुणाच्या लघवीच्या जागेवर आणि गुप्तांगावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोपही वकिलांच्या उपस्थितीत करण्यात आला.फक्त एका व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणल्याचे सांगून पोलिसांनी आपल्यावर हा अश्लील अत्याचार केल्याचे पीडित तरुणांनी सांगितले.

साध्या वेशातील लोकांनी येऊन पट्ट्यांनी मारहाण केल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व गंभीर प्रकारानंतर पूर्णेकर समर्थक अत्यंत आक्रमक झाले असून दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले असून ठाणे पोलीस यावर काय स्पष्टीकरण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







