मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने १८ निवडक लांब पल्ल्याच्या गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ जानेवारी २०२७ पासून या गाड्या सामान्य एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांना तिकिटावरील अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क द्यावे लागणार नाही. परिणामी, या गाड्यांच्या प्रवासासाठी तिकीटदरात काही प्रमाणात कपात होणार आहे.

सध्या सुपरफास्ट गाड्यांमधून प्रवास करताना मूळ तिकीट भाड्याव्यतिरिक्त प्रवाशांकडून अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क आकारले जाते. मात्र, या १८ गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द झाल्यानंतर हे शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे नियमितपणे या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.
या निर्णयाचा परिणाम मुंबई आणि पुण्याला महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील विविध शहरांशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर होणार आहे. यामध्ये सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस, एलटीटी-अयोध्या कॅन्ट तुळशी एक्स्प्रेस, एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, एलटीटी-करमळी एसी एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे.

सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याबरोबरच या सर्व गाड्यांचे सध्याचे क्रमांकही बदलण्यात येणार आहेत. १ जानेवारी २०२७ पासून नवीन ट्रेन क्रमांक लागू होतील. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षण करताना आणि प्रवासाचे नियोजन करताना सुधारित क्रमांकांची माहिती घेणे आवश्यक ठरणार आहे.

मध्य रेल्वेकडून नवीन ट्रेन क्रमांकांची अधिकृत यादी जाहीर झाल्यानंतर प्रवाशांनी त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. तसेच प्रवासापूर्वी आरक्षणाची स्थिती आणि गाडीचा सुधारित क्रमांक तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुपरफास्ट शुल्क रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकीट खर्चात बचत होणार असली, तरी गाड्यांच्या वेळापत्रकात किंवा थांब्यांमध्ये बदल होणार का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.






