पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने फुरसुंगी परिसरातून शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी तुषार नामदेव हंबीर (वय 40, रा. हडपसर) याला बेड्या ठोकल्या आहेत. मोक्का (MCOCA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता.

राजगड पोलीस ठाण्यात हंबीर याच्यावर अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राजगड परिसरातील एका व्यावसायिकाच्या मुलाचे कापूरहोळ ते नारायणपूर रस्त्यादरम्यान कार आडवी घालून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आरोपींनी तरुणाच्या तोंडात पिस्तूल घालून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली व खंडणीची मागणी केली. या घटनेनंतर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई सुरू केली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून तुषार हंबीर पोलिसांना चकवा देत होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो सातत्याने आपले राहते ठिकाण आणि मोबाईलचे सिम कार्ड बदलत होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेतला आणि फुरसुंगी परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तुषार हंबीर याच्यावर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा आणणे तसेच आर्म्स ॲक्ट यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सत्ताधारी पक्षातील प्रमुख पदावरील नेत्याला अशा प्रकारे बेड्या ठोकल्यामुळे पुण्यातील राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.







