ठाणे: शिवसेनेच्या (शिंदे गट) ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप (बाळू) पूर्णेकर हत्या प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर आणि विरोधकांचा वाढता दबाव पाहता त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी हत्येच्या आधी आणि नंतर मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा विरोधकांनी आणि पूर्णेकर यांच्या कुटुंबाने केला होता. या आरोपांमुळे संशयितांच्या यादीत शिंदे दांपत्याचे नाव आले. यानंतर ठाकरे गट आणि पूर्णेकर समर्थकांनी शिंदे दांपत्याला सह-आरोपी करून अटकेची मागणी करत ठाण्यात जोरदार आंदोलने केली होती.
राजीनामा पत्रात मीनाक्षी शिंदे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, “ज्या घटनेशी माझा थेट किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही, त्यात माझे नाव ओढले जात आहे. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन पक्षाच्या नेतृत्वाला आणि पालकमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे मला खूप मानसिक त्रास होत आहे.”

आपली ही भूमिका कोणत्याही नाराजीतून नसून केवळ पक्षाची आणि पक्षश्रेष्ठींची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्यामुळे पक्षावर अथवा नेतृत्वावर शिंतोडे उडणे मला मान्य नाही, म्हणूनच पक्षावरील निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी या पदाचा त्याग करत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.








