पुणे: पुण्यात चालत्या पीएमपीएमएल बसमध्ये एका प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची घटना घडली. प्रवासी बसमध्येच बेशुद्ध पडल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक आणि वाहकाने तातडीने बस थेट रुग्णालयाकडे वळवली. अवघ्या १५ मिनिटांत प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचवण्यात यश आले.

पुणे महापालिका भवन ते भोसरी या मार्ग क्रमांक २२१च्या बसमधून राजेंद्र मिश्रा प्रवास करत होते. बस नाशिक फाटा परिसरात आली असता मिश्रा अचानक बसमध्येच बेशुद्ध पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बसचालक रवींद्र दुनघव आणि वाहक नलावडे यांनी तातडीने निर्णय घेतला. चालक दुनघव यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून बस अन्य ठिकाणी न थांबवता थेट पिंपरी येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाकडे वळवली. वाहतूक कोंडीतून मार्ग काढत अवघ्या १५ मिनिटांत बस रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचवण्यात आली.

यानंतर चालक आणि वाहकाने राजेंद्र मिश्रा यांना तातडीने आपत्कालीन उपचार विभागात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मिश्रा यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे. या निर्णयामुळे आपल्या वडिलांना वेळेत उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मिश्रा यांच्या मुलगी शिवानी मिश्रा यांनी दिली.
“परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे वरिष्ठांशी बोलून थेट बस रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. प्रवाशाला सुखरूप दाखल केल्यानंतर आम्ही बस पुन्हा मार्गावर नेली,” अशी माहिती बसचालक रवींद्र दुनघव यांनी दिली.






