पुणे : कौटुंबिक अडचणी दूर करण्यासह शारीरिक व्याधी कमी करण्याचे आश्वासन देत मृत्यूची भीती दाखवून पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप असलेल्या मोनाली आई विधाते हिच्यासह पाच जणांविरोधात बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

मोनाली विधाते, कृष्णा विधाते, मोनालीचा भाऊ मयुर, अशोक बनकर आणि मंजु कौर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील ४७ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. सुखसागरनगर येथील मोनाली विधाते हिच्या घरीही संबंधित व्यक्तीला बोलावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मोनाली विधाते हिने फेसबुकवर ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ या नावाने खाते तयार केले होते. त्यावर कौटुंबिक अडचणी सोडविणे आणि देवी-देवतांशी संबंधित विविध व्हिडिओ प्रसारित करण्यात येत होते. त्यानंतर तक्रारदाराला शारीरिक व्याधी आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली हळदी-कुंकू, दोरा आणि बाहुली पाठवण्यात आली. पुढे त्यांना सुखसागरनगर येथील घरी बोलावून त्यांच्या अडचणींचे कारण सांगताना मृत्यूची भीती दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, मोनाली विधाते आणि अशोक बनकर यांनी भेटण्यासाठी ३ हजार १०० आणि ३०० रुपये घेतले. तसेच कथित जादूटोणा साहित्य आणि दोन वेळा उतारे करण्याच्या नावाखाली रोख २१ हजार रुपये आणि ऑनलाइन २१ हजार रुपये, अशी एकूण ४५ हजार ४०० रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत तसेच मृत्यूची भीती दाखवून पैसे घेण्यात आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर मोनाली विधाते आणि इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत.







