दौंड, ता. 28 : ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून कुरकुंभ येथे एका कुटुंबाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. यामध्ये महिलेच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, तिची मुलगी आणि नातवाला देखील मारहाण करण्यात आल्याची तक्रार आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 5 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास कुरकुंभ येथे घडला. ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे मागितले असता, फिर्यादी महिलेने पैसे नसल्याचे सांगितले. यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर एका आरोपीने लाकडी दांडक्याने महिलेच्या डाव्या हातावर वार केला, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलीला केस धरून मारहाण करण्यात आली. तसेच नातवाला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. जखमी महिलेवर बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना तिने पोलिसांना जबाब दिला.

या प्रकरणी लहु वसंत काळे, महेश ऊर्फ चम्या काळे, समीर काळे, अकबर काळे आणि आरती काळे यांच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पठाण पुढील तपास करीत आहेत.








