न्हावरे: करडे (ता.शिरूर) येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील तब्बल 520 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत अंदाजे 1 लाख 56 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करडे (ता.शिरूर) परिसरातील स्टेरिऑन कंपनीच्या शेजारील शेड क्रमांक-13 च्या दक्षिणेस असलेल्या मोकळ्या जागेमधील 630 के.व्ही. क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. हा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यामधील अंदाजे 520 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांची किंमत अंदाजे 1 लाख 56 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी नानासाहेब हरिभाऊ सोनवणे (वय-50) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.27) अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमागे कोणाचा हात आहे, तसेच चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांचा शोध लागणार का? याकडे आता लक्ष लागले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास न्हावरे दुरक्षेत्र पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर हे करीत आहेत.

परिसरातील भंगार व्यावसायिकांकडे शंकेची सुई…..

संबंधित विद्युत रोहित्रामधील चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारांची विल्हेवाट चोरट्यांनी कुठे लावली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पंचक्रोशी परिसरातील भंगार व्यावसायिकांकडे शंकेची सुई वळली असून, पोलिसांनी या दिशेनेही तपास करण्याची गरज सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.






