इंदापूर : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित बोकडाच्या जेवणाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एका 32 वर्षीय शेतकऱ्याला शिवीगाळ करून लाकडी काठीने डोक्यावर मारहाण केल्याची घटना पिटेवाडी (ता. इंदापूर) येथे घडली. या मारहाणीत ज्ञानेश्वर पोपट क्षीरसागर हे जखमी झाले असून, उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानेश्वर क्षीरसागर हे पत्नी कल्याणी आणि चुलत भाऊ योगेश यांच्यासह पिटेवाडी येथे पाहुणे उद्धव होनकडे यांच्या घरी जेवणाच्या कार्यक्रमासाठी 25 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गेले होते. यावेळी त्यांचे नातेवाईक अनंता राऊत आणि लखन अनंता राऊत यांच्याशी त्यांची भेट झाली.
अनंता राऊत यांनी क्षीरसागर यांना कार्यक्रमाला का आले, अशी विचारणा करत शिवीगाळ सुरू केल्याचा आरोप आहे. त्यावर क्षीरसागर यांनी आपल्याला जेवणासाठी निमंत्रण असल्याचे सांगितले. त्यानंतर अनंता राऊत आणि लखन राऊत यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी लखन राऊत याने तेथे पडलेली लाकडी काठी उचलून क्षीरसागर यांच्या डोक्यात मारल्याचा, तर अनंता राऊत याने हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

भांडण सुरू असताना चुलत भाऊ योगेश क्षीरसागर आणि मित्र अमर फडतरे यांनी मध्यस्थी करून वाद सोडविला. डोक्याला दुखापत झाल्याने क्षीरसागर यांना इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी अनंता राऊत आणि लखन अनंता राऊत (दोघे रा. सारोळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.








