पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी अवघ्या १२ तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या प्रकरणांतील आरोपी पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत ठार झाले. एका प्रकरणात १७ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप असलेला आरोपी, तर दुसऱ्या प्रकरणात भाजप कार्यकर्त्याच्या हत्येतील मुख्य आरोपी मारला गेला. या घटना उत्तर २४ परगणा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यांत घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या घटनाक्रमाची पुनर्रचना सुरू असताना दोन्ही आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात ते जखमी झाले. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील गायघाटा येथे १७ वर्षीय अकरावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात २३ वर्षीय प्रल्हाद दास याला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, गुन्ह्याच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे जप्त करण्यासाठी त्याला घरी नेण्यात आले होते.
तेथून परत येताना आरोपीने नैसर्गिक विधीसाठी थांबण्याची विनंती केली. त्यानंतर त्याने एका पोलीस अधिकाऱ्याचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केला, असा पोलिसांचा दावा आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दास जखमी झाला. त्याला चांदपारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले; मात्र या घटनेमुळे झालेली हानी भरून निघणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, आरोपीच्या कुटुंबीयांनी कथित चकमकीबद्दल संताप व्यक्त केला. परिसरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला.

दुसरी घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात घडली. भाजप कार्यकर्ता सुजित मंडल याच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी समायून शेख हा सीआयडी पथकासोबत झालेल्या कथित चकमकीत ठार झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मंडलच्या हत्येचा घटनाक्रम पुन्हा उभा करण्यासाठी शेख याला समसेरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘ओल्ड डाक बंगला’ परिसरात नेण्यात आले होते. त्यावेळी त्याने एका पोलीस अधिकाऱ्याचे शस्त्र हिसकावून सीआयडी पथकावर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला, असा पोलिसांचा दावा आहे. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सुजित मंडल यांच्या हत्येनंतर पोलिसांच्या निष्काळजीपणाचे आरोप झाले होते. त्यानंतर काही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. या दोन्ही घटनांनंतर संबंधित भागांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.







