शिक्रापूर : मुलांच्या खेळण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे घडली. चुलत भावाला मारहाण होत असल्याचे पाहून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाच्या पाठीवर, डाव्या खांद्याजवळ लाकडी काठीने मारहाण करण्यात आल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी शिवाजी बाळू पांडे आणि शाहाजी बाळू पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, वढू बुद्रुक येथील विठ्ठल मंदिराजवळ अक्षय मारुती पांडे हा घरात 27 ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अभ्यास करत होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या संबंधित आरोपींची मुले घरासमोर खेळत होती. त्यांच्या खेळण्यामुळे अभ्यासात व्यत्यय येत असल्याने अक्षयने त्यांना तेथे खेळू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरून दोघांनी अक्षयला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
यावेळी ‘मुलांच्या अभ्यासात त्रास होत असेल तर घर सोडून जा, ही जमीन माझ्या वडिलांची आहे,’ असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. हा प्रकार पाहून अक्षयचा चुलत भाऊ ओम विजय पांडे (वय 21 ) भांडण सोडवण्यासाठी गेला असता, शाहाजी पांडे याने शेजारी पडलेली लाकडी काठी उचलून त्याच्या पाठीवर डाव्या खांद्याजवळ मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेत ओम जखमी झाला असून, वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर त्याने शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.








