न्हावरे : घोड धरण जवळ असूनही न्हावरेकरांना पाणी मिळत नसल्याची दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. न्हावरे गावाला घोड धरणातून होणारा नियमित पाणीपुरवठा न्हावरे गाव परिसरातील मुख्य पाइपलाइन फुटल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून रात्रंदिवस प्रयत्न करूनही फुटलेली पाइपलाइन नेमकी कुठे आहे, याचा शोध लागत नसल्याने गावठाणासह परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी ‘हर घर जल’ ही संकल्पना राबविण्यात आली. मात्र, न्हावरे परिसरात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाइपलाइन वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी फुटत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्यामुळे न्हावरे परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाच दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी वणवण!

न्हावरे गावठाण परिसरात पाइपलाइन फुटल्याने पाच दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. संबंधित ग्रामपंचायत पाणीपुरवठा यंत्रणेकडून फुटलेल्या पाइपलाइनचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी अद्याप यश मिळालेले नाही. परिणामी, पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि दैनंदिन वापरासाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. धरणातून पाणी उपलब्ध असतानाही केवळ पाइपलाइनच्या बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पाइपलाइनच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी….
मुख्य पाइपलाइन वारंवार का फुटते, याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दुरुस्तीचे काम पूर्ण करावे आणि गावठाणासह सर्व वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ‘हर घर जल’चा नारा देणाऱ्या योजनेतून प्रत्यक्षात घराघरांत पाणी कधी पोहोचणार? हा प्रश्न आता न्हावरेकरांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
“न्हावरे गाव आणि वाडी-वस्त्यांवर पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे दुरुस्तीचे काम प्राधान्याने सुरू असून, पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल”.
-विष्णू गाडेकर (प्रशासक ,न्हावरे ग्रामपंचायत)







