रांजणगाव : रस्त्याच्या मधोमध उभी केलेली मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून एका शेतकऱ्याला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना रांजणगाव गणपती परिसरातील फंडवस्ती रोडवर घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, त्याच्या स्विफ्ट डिझायर कारच्या पुढील व मागील काचा फोडून नुकसान करण्यात आले. तसेच मारहाणीच्या दरम्यान गळ्यातील सोन्याची चेन आणि हातातील घड्याळ गहाळ झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेताकडे जात असताना वक्रतुंड पार्कजवळील वक्रतुंड कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याच्या मधोमध एक मोटारसायकल 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उभी होती. त्यामुळे फिर्यादीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तींना मोटारसायकल बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची टिंगल केल्याचा आरोप असून, त्यानंतर वाद वाढला.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून काही जण धावत आले आणि त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. यावेळी एका व्यक्तीने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर वार केला, तर दुसऱ्याने बांधकामाच्या ठिकाणाहून लोखंडी गज आणून उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारल्याचा आरोप आहे. इतरांनीही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या हल्ल्यानंतर फिर्यादी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपींनी दगड मारून कारच्या पुढील व मागील काचा फोडल्या तसेच बोनटचे नुकसान केले, असे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात गौरव बोऱ्हाडे, विजय भालेराव, कुणाल पाटील, रोहित बहिरट आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. या घटनेची नोंद रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हवालदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत







