जामखेड, (नगर) : जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, शहरातील अस्ताव्यस्त वाढलेले अतिक्रमण आणि खिळखिळी झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे शनिवारी रात्री एका निष्पाप आणि तरुण हॉटेल व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. भरधाव वेगाने आलेल्या एका पिकअप वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत सिद्धेश्वर (सिद्धू) गणेश म्हेत्रे (वय अंदाजे 32, रा. जामखेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी जामखेड शहरात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमातर सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक शांततेत संपली. हा ऐतिहासिक सोहळा आटोपून आपल्या घरी जाण्यासाठी जामखेडमधील तरुण हॉटेल व्यावसायिक सिद्धू म्हेत्रे हे शहरातील ‘रेणुका हॉटेल’ समोर उभे होते.

ते रस्त्याच्या कडेला उभे असतानाच, पाठीमागून अनियंत्रित वेगाने आलेल्या एका पिकअप वाहनाने सिद्धू म्हेत्रे यांना पाठीमागून भीषण धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात कडक दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम दीर्घकाळापासून रखडलेले आहे. त्यातच शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवण्यासंदर्भात स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभाग कोणतीही कडक ठोस कारवाई करत नाही. वारंवार होणाऱ्या भीषण अपघातानंतरही प्रशासन ढिम्म आहे. “जर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाले असते आणि रस्त्यावरील अतिक्रमणे वेळीच हटवली असती, तर आज सिद्धू म्हेत्रे यांच्यासारख्या उमद्या तरुणाचा जीव वाचला असता,” अशी संतप्त प्रतिक्रिया जामखेडच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वाहतुकीची कोंडी रोजचीच झाली असून अपघात वाढले आहेत. मात्र, या गंभीर प्रश्नावर ठोस आणि प्रभावी तोडगा काढण्याऐवजी स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये केवळ कामाचे ‘श्रेय’ घेण्याची स्पर्धा सुरू असल्याची भावना नागरिकांनी उघडपणे बोलून दाखवली आहे.







