भोपाळ: भोपाळमधून एक अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांसारख्या जबाबदार पदावर असलेल्या दोन जणांनी खाकी वर्दीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची लाजीरवाणी घटना घडली आहे. या गंभीर गुन्ह्यात मदत करणाऱ्या त्याच्या दुसऱ्या सहकारी पोलिसालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी संतोष सेन हा धार येथील विशेष सशस्त्र दलात (SAF) आरक्षक म्हणून कार्यरत आहे. २२ जुलै रोजी संध्याकाळी त्याने एका ओळखीच्या महिलेशी संपर्क साधून स्वतःच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे सांगितले. वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे असे सांगून त्याने पीडित अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले. मुलगी साधीभोळी असल्यामुळे ती तिथे पोहोचली. मात्र, तिथे आरोपी संतोष आणि त्याचा साथीदार जितेंद्र राजपूत (जो ग्वाल्हेरमध्ये विशेष सशस्त्र दलात आरक्षक आहे) हे दोघे कार घेऊन आधीपासूनच उभे होते. विशेष म्हणजे, आरोपी जितेंद्रसोबत त्याचा ३ ते ४ वर्षांचा लहान मुलगाही गाडीत बसलेला होता.

त्यानंतर दोन्ही पोलिसांनी त्या मुलीला बळजबरीने कारमध्ये बसवले आणि एम. पी. नगरमधील प्रगती पेट्रोल पंपाच्या परिसरातील एका घरात नेले. नराधम संतोषने त्या मुलीवर अत्याचार केला, तर त्याचा सहकारी पोलीस कर्मचारी जितेंद्र आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन घराच्या बाहेर आणि पायऱ्यांवर पहारा देत उभा राहिला होता.
या घटनेनंतर पीडित मुलीने मोठे धाडस दाखवत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर पॉक्सो कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.






