पुणे: पुणे शहरामध्ये सध्या घरफोडी आणि चोऱ्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला आहे. सामान्य घरांसोबतच आता चोरांनी थेट घाऊक दुकानांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भागांत चोरट्यानी डल्ला मारला असून, या धक्कादायक प्रकारामुळे व्यापारी वर्गात आणि रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहिली खळबळजनक घटना मार्केट यार्ड परिसरातील शिवनेरी रस्त्यावर घडली. येथील ‘महालक्ष्मी ट्रेडर्स’ या सिगारेटच्या घाऊक दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी मोठा हात साफ केला. दुकानाचे मालक विजय सिंघी यांनी मंगळवारी रात्री आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन आलेल्या अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर बळाने उघडून आत प्रवेश केला.

दुकानातील नामांकित ब्रँड्सचे तब्बल 7 लाख रुपयांचे सिगारेटचे बॉक्स लांबवून चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी दुकान उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







