अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला परिसरात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत चार शेळ्या चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. याच रात्री गणेगाव खालसा येथेही शेळ्या चोरीला गेल्याची, तर रांजणगाव गणपती परिसरात घरांच्या खिडक्या फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार २२ जुलै रोजी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास पिंपरी दुमाला येथील साहेबराव चिखले यांच्या गोठ्यातून तीन शेळ्या, तर राजेंद्र खेडकर यांच्या गोठ्यातील एक शेळी अशी एकूण चार शेळ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या आहेत.
या चोरीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या चोरीपूर्वी मध्यरात्री गावातील रस्त्यांवर एक सुमो गाडी संशयास्पदरीत्या फिरताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे या वाहनाचा चोरीच्या घटनांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान पिंपरी दुमाल्यालगतच्या गणेगाव खालसा परिसरातही त्याच रात्री शेळ्या चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक रोड परिसरात काही घरांच्या खिडक्या तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून काही ठिकाणांहून कोंबड्याही चोरीला गेल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. एकाच रात्री पिंपरी दुमाला, गणेगाव खालसा आणि रांजणगाव गणपती या तीन वेगवेगळ्या परिसरात चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करावी तसेच चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.






