पुणे: पुणे विभागातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत स्वच्छतेच्या निकषांचे उल्लंघन करणाऱ्या १२ आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. १८ ते २१ जुलैदरम्यान पुणे, चिंचवड आणि सातारा जिल्ह्यातील वडूज परिसरात करण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत ही कारवाई करण्यात आली.

एफडीएचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा आणि अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील नियमांचे उल्लंघन आढळून आले. या अनियमितता लक्षात घेऊन संबंधित आस्थापनांचे परवाने आणि काही प्रकरणांमध्ये अन्न व्यवसायाची नोंदणीही निलंबित करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान सुमारे ३ लाख ४८ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. तसेच संबंधित प्रकरणांमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहितीही प्रशासनाने दिली.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. औषध कंपन्या, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींची नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वीही पुणे विभागात अशाच विशेष मोहिमेदरम्यान सात हॉटेलांचे परवाने निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या तपासणीत आणखी १२ आस्थापनांवर कारवाई झाल्याने अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ग्राहकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कारवाई भविष्यातही सुरू राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.






