यवत, (पुणे) : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तिच्याकडून तब्बल 1 लाख 7 हजारांचा 500 रुपये किमतीचा 2 किलो 150 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई खोपोडी, गरडवस्ती (ता. दौंड) येथे शुक्रवारी (ता. 07) दुपारी तीन वाजेच्या सुमारास केली.

कमल बबन गरदडे (वय -66, रा. खोपोडी, गरदडे वस्ती, ता. दौंड, जि. पुणे) असे अमली पदार्थांचा साठा बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्या वृद्ध महिला आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार संदीप देवकर यांनी यवत पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास खोपोडी येथील गरदडे वस्तीवर एका घरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची खरेदी-विक्री चालत असल्याची गुप्त बातमी यवत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांना मिळाली होती. मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने तातडीने विशेष पथक तयार केले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी खोपोडीतील गरदडे वस्तीवर संशयित कमल गरदडे हिच्या राहत्या घराला वेढा मारून धाड टाकली.

महिला पोलिसांच्या उपस्थितीत आरोपी कमल गरदडे हिच्या घराची पंचांसमक्ष झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी तिने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेला 2 किलो 150 ग्रॅम वजनाचा हिरवट काळसर रंगाचा बिया, बोंडे व भुग्यासह असलेला गांजा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी हा सर्व गांजा तात्काळ जप्त करून ताब्यात घेतला.
सदरची कारवाई यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, सपोनि आबा गाढवे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, पोलीस अंमलदार संदीप देवकर, महेंद्र चांदणे, अमोल काळे, संदीप करे, धीरज जाधव, प्रतीक जगताप, मारुती बाराते आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नाली टिळवे यांच्या पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे आणि पोलीस अंमलदार प्रतीक धिवार करत आहेत.







