इराण: काही आठवड्यांच्या तुलनेने शांततेनंतर अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणच्या लारक बेटावरील दोन लष्करी लॉन्चरवर हल्ला केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीत समुद्री सुरुंग पेरण्यासाठी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सकडून तयारी सुरू असल्याचे अमेरिकेने सांगितले. जुलैच्या अखेरीपासून इराणवर झालेला हा पहिला जाहीर अमेरिकी हल्ला असल्याचे वृत्त आहे.

अमेरिकेच्या कारवाईनंतर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्याचा दावा केला. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने जॉर्डनमधील किंग हुसेन आणि अल-अझराक या अमेरिकी लष्करी तळांना क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केल्याचे सांगितले. मात्र, जॉर्डनच्या लष्कराने 8 क्षेपणास्त्रे हवेतच रोखल्याचे म्हटले असून, तळांवर मोठ्या प्रमाणात नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या संघर्षाच्या केंद्रस्थानी होर्मुझची सामुद्रधुनी आहे. लारक बेट या महत्त्वाच्या सागरी मार्गाजवळ असल्याने त्याचे सामरिक महत्त्व मोठे आहे. जगातील तेल वाहतुकीचा सुमारे एक-पंचमांश हिस्सा या मार्गातून जात असल्याने येथे निर्माण होणारा कोणताही लष्करी तणाव जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम करू शकतो.

होर्मुझमधील आंतरराष्ट्रीय जहाज मार्गांवरून समुद्री सुरुंग हटवण्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले होते. त्यानंतर इराणी सैन्याकडून पुन्हा सुरुंग पेरण्याची तयारी होत असल्याचा दावा अमेरिकेने केला. दरम्यान, या नव्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही चिंता वाढली आहे. हल्ल्यांच्या वृत्तानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, होर्मुझमधील वाहतूक विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम इंधनाच्या दरांवर आणि जागतिक पुरवठा साखळीवर होऊ शकतो. अमेरिका आणि इस्रायलने फेब्रुवारीमध्ये इराणविरोधात लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर या संघर्षाला सहा महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.






