छत्रपती संभाजीनगर: राज्यात गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे जुन्या वादातून रोहित पठारे या तरुणाची हत्या करण्यात आली. वैजापूर येथील रोहित पठारे हत्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. जुन्या वादातून रोहितला वेगवेगळ्या चौकांत नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्याने पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडावर लघवी केल्याचा संतापजनक दावाही कुटुंबीयांनी केला आहे.

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रोहितच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी कुटुंबीयांनी आरोपींना कठोर शिक्षा, अगदी फाशी देण्याची मागणी केली. पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आणि आरोपींना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींच्या शोधासाठी 5 पथके तैनात केली आहेत. पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय विभागाकडून 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी केली.







