पुणे: दिवाळीच्या उत्सवात यंदा एक खास योग जुळून आला आहे. रविवार, 8 नोव्हेंबर 2026 रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे सकाळी अभ्यंगस्नान आणि नरक चतुर्दशीची पूजा, तर संध्याकाळी लक्ष्मीपूजन असे धार्मिक विधी भाविकांना पार पाडावे लागतील. या दोन्ही पूजांसाठी शुभ वेळ कोणती, ते जाणून घेऊया.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी का?
हिंदू पंचांगातील तिथींच्या वेळेमुळे यंदा हा योग निर्माण झाला आहे. चतुर्दशी तिथी 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:47 वाजता सुरू झाली असून 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:27 वाजता संपणार आहे. त्यानंतर अमावस्या सुरू होईल. नरक चतुर्दशीचे अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी केले जाते, तर लक्ष्मीपूजन अमावस्येच्या प्रदोषकाळात केले जाते.
अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त
नरक चतुर्दशीला पहाटे तेल आणि उटणे लावून स्नान करण्याची परंपरा आहे. यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

-
दिनांक: रविवार, 8 नोव्हेंबर 2026
-
अभ्यंगस्नान: पहाटे 5:45 ते सकाळी 6:42
-
सूर्योदय: सकाळी 6:42
स्नानानंतर स्वच्छ कपडे घालून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी. फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करावा. काही ठिकाणी यमदीपदान करण्याचीही प्रथा आहे.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे. देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि सरस्वती यांची पूजा करून घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते.
-
दिनांक: रविवार, 8 नोव्हेंबर 2026
-
लक्ष्मीपूजन: संध्याकाळी 6:27 ते रात्री 8:27
-
प्रदोषकाळ: संध्याकाळी 6:02 ते रात्री 8:34
-
वृषभ स्थिर लग्न: संध्याकाळी 6:27 ते रात्री 8:27
-
अमावस्या प्रारंभ: सकाळी 11:27
लक्ष्मीपूजनाची तयारी?
पूजेपूर्वी घर आणि देवघर स्वच्छ करावे. प्रवेशद्वारावर रांगोळी काढून फुलांची सजावट करावी. पूजेच्या ठिकाणी लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून देवी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप, मिठाई आणि नैवेद्य तयार ठेवावा. प्रथम गणेशपूजन करून त्यानंतर लक्ष्मीपूजा आणि आरती करावी.







