लोणी काळभोर, ता. ७ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सिद्राम मळा परिसरातून 27 वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत पतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहिता आणि तिच्या सासूमध्ये किरकोळ कारणावरून २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पूजा घरातून निघून तिच्या चुलत्यांकडे राहण्यासाठी गेली होती. ४ नोव्हेंबरपर्यंत ती नातेवाइकांकडेच असल्याचे पतीने जबाबात नमूद केले आहे.
दरम्यान, विवाहितेला तिच्या चुलत भावाने दुचाकीवरून खोकलाई चौकात ४ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सोडले होते. तेथून ती घरी जात असल्याचे सांगून निघाली होती. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नाही. पतीने आई आणि इतर नातेवाइकांच्या मदतीने खोकलाई चौक तसेच परिसरात तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.

अखेर पत्नी बेपत्ता झाल्याने तिचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असावे, असा संशय पतीने व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.







