मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईत धडक देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या अंतरवाली सराटी येथे त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, मराठा समाजाकडून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्यातील मराठा बांधवांना गनिमी काव्याचा वापर करत हळूहळू मुंबईच्या दिशेने येण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत आंदोलकांच्या राहण्याची अडचण भासू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी पुढील 6 दिवसांत शहरातील आपले नातेवाईक आणि ओळखीच्या पाहुण्यांचा शोध घेऊन मुक्कामाची सोय करावी, अशी सूचना जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंबईमध्ये मराठा समाजाची 1 ते 2लाख कुटुंबे राहत असल्याने सर्वांनी वेगवेगळ्या भागात आश्रय घ्यावा. मात्र, सध्या आझाद मैदान आणि मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याकडे जाणे टाळावे, असे रणनीती स्पष्ट करताना त्यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत जवळपास 5 ते 50 लाख मराठा तरुणांनी मुंबई गाठावी, असे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. हे आंदोलन पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत कोणताही वाद न घालता सहकार्य करण्याचे आणि पोलीस ठाण्यात बोलावल्यास शांततेत जाऊन भेटण्याचे आवाहन त्यांनी मराठा तरुणांना केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या या हाकेमुळे मराठा आंदोलकांमध्ये पुन्हा नवा उत्साह पाहायला मिळत असून, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावरील ताण वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे यंदाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान निर्माण होऊ शकते.






