संतोष पारधी
वाकी बुद्रुक : येथील गावचे सुपुत्र साहिल शांताराम कड याने सीएच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करून उत्तीर्ण झाला असुन दृढ निश्चय, कठीण मेहनत माणसाला जिंकवतेच याचा प्रत्यय दाखवून दिला आहे. कठोर मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर साहिल ने सीएची परीक्षा पास (Passed CA Exam) केली आहे. परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि त्यातूनच संघर्ष करत आपले ध्येय प्राप्त करता येते अस म्हणले जाते. चाकण जवळील वाकी बुद्रुक येथे त्याचा प्रत्यय येतो. घरची परिस्थिती अतिशय नाजूक असताना आई वडिलांनी दिलेल्या हिंमतीच्या बळावर त्याने सीएची परीक्षा उत्तीर्ण केली.
साहिलने आज यशाला गवसणी घातली आहे. मात्र त्याचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. बालपणापासून घरची परिस्थिती बेताची. मात्र मनात काहीतरी करण्याची जिद्द होती. अशा परिस्थितीत दिवसाचे १२-१४ तास अभ्यास करणं हे एकमेव ध्येय साहिलने डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि न डगमगता प्रवास सुरू केला.
त्याचं शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक गावठाण येथील शाळेत झालं. तिथं दहावीला त्याला ८० टक्के मार्क मिळाले तर पुढील शिक्षण खेड येथे झालं तिथे बारावीला देखील ८० टक्के मार्क मिळाले होते. गणिताची आवड सुरुवातीपासून असल्यानं, त्याने सीए होण्याचं ठरवलं, त्यानंतर लगेच पुणे गाठलं आणि पुढील अभ्यास सुरू करून मनात जिद्द ठेवून पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. यासाठी त्याचे आई वडिल, मोठा भाऊ राहुल हे सर्व सावलीसारखे त्याच्या मागे उभे होते.
गुणवत्तेला (Talent Has No Limitations) कसलाही लगाम नसतो याचा प्रत्यय वारंवार येत असतो. त्याच्या यशामुळे वाकी बुद्रुक व परिसरात आनंदाचे वातावरण आहे, सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.