उरुळी कांचन, (पुणे) : मुलाच्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेचा पदर ओढून विनयभंग केल्याचा तसेच महिला आणि तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. 08) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पेठ (ता. हवेली) हद्दीत घडली.

शाकीर गफुर सय्यद, रमजान गफुर सय्यद आणि सिकंदर गफुर सय्यद (सर्व रा. पेठ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत एका 33 वर्षीय महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा हा त्यांच्या बहिणीच्या घरी गेला आहे का, याची विचारणा करण्यासाठी त्यांनी बहिणीला फोन केला होता. त्यावेळी फोनवर एका व्यक्तीचा आवाज ऐकू आला. त्यानंतर बहिणीने मुलाचे काहीतरी भांडण झाले असल्याचे सांगून तातडीने घरी येण्यास सांगितले.

त्यानुसार सदर महिला बहिणीच्या घरी गेल्या असता तेथे शाकीर आणि रमजान सय्यद हे दोघे उपस्थित होते. मुलगा फोनवरून शिवीगाळ करतो, असे म्हणत रमजान याने त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर शाकीर याने त्यांच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली आणि पदर ओढल्याने आपला विनयभंग झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, तेथे आलेल्या सिकंदर सय्यद यानेही फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. जातीवरून अपमानास्पद बोलून गावात राहायचे नाही, असे म्हटले. तसेच मुलाचे पाय काढण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस करीत आहेत.







