पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामानातील लहरीपणा आणि नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या शेती नुकसानापासून वाचण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 अंतर्गत रब्बी हंगामातील पिकांसाठी विमा नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण सात पिकांना विमा सुरक्षा मिळणार आहे. यामध्ये गहू, ज्वारी, मका, हरभरा, कांदा, उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश आहे. दुष्काळसदृश परिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेद्वारे योग्य ती आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते. त्यामुळे ऐन वेळी धावपळ करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मुदत संपण्यापूर्वीच नोंदणी करून घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून दिला जात आहे.
वेगवेगळ्या पिकांसाठी विमा अर्ज करण्याची अंतिम मुदत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:

ज्वारी: 30 नोव्हेंबर 2026

गहू, हरभरा आणि कांदा: 15 डिसेंबर 2026
उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग: 31 मार्च 2027
या योजनेत बँक कर्जदार तसेच बिगर कर्जदार असे दोन्ही शेतकरी सहभागी होऊ शकतात. मात्र, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष ज्या पिकाची पेरणी केली आहे, त्याच पिकाचा विमा काढणे बंधनकारक आहे. जर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे नसेल, तर त्यांना अंतिम मुदतीच्या कमीत कमी सात दिवस आधी संबंधित बँकेत जाऊन विमा हप्ता कपात न करण्याबाबतचे लेखी घोषणापत्र द्यावे लागेल.
विमा नोंदणीसाठी शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) पोर्टल, ‘क्रॉप इन्शुरन्स’ ॲप, आपले सरकार सेवा केंद्र, जवळची बँक किंवा सीएससी (CSC) केंद्राशी संपर्क साधू शकतात.
योजनेच्या सुरुवातीच्या काळातच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2026 या अवघ्या 11 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून एकूण 599 अर्ज प्राप्त झाले आहेत. याद्वारे सुमारे 392 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विमा संरक्षण मिळाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक भर कांदा पिकाच्या विम्यावर दिला असून, त्याखालोखाल ज्वारी, हरभरा, मका आणि गहू पिकांची नोंदणी झाली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसांची वाट न बघता लवकरात लवकर आपल्या पिकांचा विमा उतरवून सुरक्षित व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे






