पुणे : मराठा समाजाची एकजूट अधिक भक्कम करण्यासाठी आणि भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या हेतूने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रत्येक घरात एक मराठा सेवक’ निर्माण व्हावा, या संकल्पनेतून त्यांनी राज्यातील मराठा आणि कुणबी कार्यकर्त्यांसाठी आज एक विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

दसऱ्याच्या मेळाव्यात जरांगे पाटील यांनी समाजहितासाठी काम करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी 9421292222 हा संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. मात्र, या क्रमांकावर कोणीही थेट कॉल करू नये, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे. इच्छुक बांधवांनी या नंबरवर केवळ मेसेजद्वारे आपले संपूर्ण नाव, राहण्याचा पत्ता आणि सध्या ते कोणते काम करतात, याची माहिती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना जरांगे पाटील म्हणाले की, समाजासाठी काम करणाऱ्या प्रत्येक सेवकासाठी ‘समाज प्रथम आणि राजकारण नंतर’ हेच मुख्य सूत्र असले पाहिजे. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता, संकटांच्या काळातही प्रामाणिकपणे समाजाच्या प्रगतीसाठी झटणे गरजेचे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात जिथे कुठे समाजाच्या हक्कासाठी सभा किंवा आंदोलने होतील, तिथे या सेवकांनी पुढाकार घेऊन समाजाला जागृत करावे आणि सर्वांना एकत्र आणावे.

मराठा समाजातील मुलांच्या कल्याणासाठी आणि हक्कांच्या लढ्याला बळ देण्यासाठी राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन ‘मराठा सेवक’ म्हणून आपली नोंदणी करावी, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.







